![]() |
| गणेश चतुर्थी |
भाद्रपद महिन्यातली चतुर्थी, गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. खरे तर हा दिवस एका मोठ्या उत्सवाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. तो उत्सव म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव - गणेशोत्सव. हा उत्सव भारतात - परदेशात फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि त्यातही महाराष्ट्रात याचे महत्व अनन्यसाधारण आहे. दिवाळी खालोखाल किंवा तितकाच उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे हा! चला तर जाणून घेउयात हा उत्सव ज्या दिवसापासून सुरु होतो त्या गणेश चतुर्थी विषयी!
गणपती विशेष: हा दिवस गणपतीचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो. गणपती हा शंकर आणि पार्वती ह्यांचा पुत्र आहे. विद्या आणि अनेक कलांची देवता म्हणून गणपती ओळखला जातो. इतकेच काय तर गणपतीला कोणत्याही कार्यात सर्वात पहिले मानाने पुजले जाते. गणपतीची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न केल्यास सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते अशी धारणा आहे. गणपती हे त्याच्या सुंदर, मनोहारी रुपामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे आवडते, लाडके दैवत आहे. सगळे गणपतीला प्रेमाने बाप्पा म्हणून ओळखतात.
आख्यायिका गणेश जन्माची: पार्वतीला एकदा स्नानासाठी जायचे होते. असे म्हणतात कि आपल्या अंगावरच्या मळाला आकार देऊन तिने एक मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण ओतले. हि जिवंत झालेली मूर्ती म्हणजेच गणपती! पार्वती स्नानासाठी जाण्यास निघाली आणि तिने गणपतीला पहारेकरी म्हणून नेमले. तिने आज्ञा केली कि कोणालाही आतमध्ये येउ देउ नकोस. थोड्याच वेळात शंकर भगवान तिथे आले आणि आत जाऊ लागले. तेव्हा आईच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करत असणाऱ्या गणपतीने त्यांना अडवले आणि आत जाण्यास मज्जाव केला. यावर शंकर भगवान संतप्त झाले आणि रागाच्या भरात त्यांनी गणपतीचे शीर धडावेगळे केले. थोड्याच वेळात पार्वती स्नान उरकून बाहेर आली आणि तिने हा प्रकार पहिला. ती प्रचंड संतापली आणि तिने शंकराला गळ घातली कि गणपतीला परत जिवंत करा. शंकराने तिची खूप मनधरणी केली पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तेव्हा शंकराने आपल्या गणांना आज्ञा केली कि पृथ्वीतलावर जा आणि जो प्राणी आधी दिसेल त्याचे शीर घेऊन या. अशी आज्ञा मिळाल्यावर सर्व गण प्राण्याच्या शोधात निघतात आणि त्यांना सगळ्यात पहिले हत्ती दिसतो. ते त्याचे शीर घेऊन परत येतात. शंकर भगवान ते शीर धडाला जोडतात आणि गणपतीला जिवंत करतात. म्हणून गणपती हा गजानन ह्या नावानेही ओळखला जातो. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख! हे सगळे चतुर्थीच्या दिवशी घडले म्हणूनच गणेश चतुर्थीला खूप महत्व आहे.
चंद्राचा शाप: गणेश चतुर्थीविषयी अजून एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे. एकदा गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांनी दिलेला प्रसाद भरपेट खाउन, काही मिठाई बरोबर घेऊन निघाले. अशा अवस्थेत ते त्यांच्या वाहनावरून म्हणजे उंदीरमामावरून पडले. गणपती बाप्पा उठून उभे राहिले आणि त्यांनी मिठाई गोळा केली. त्यांना वाटले कि आजूबाजूला कोणी नाही आहे, त्यामुळे कोणी पहिले नसेल. पण नेमका हा सगळा प्रकार आणि त्यांचे हे रूप चंद्रानी पहिले आणि तो जोर-जोरात हसू लागला. ते पाहून बाप्पाला राग आला आणि त्याने स्वतःच्या रूपाचा गर्व असणाऱ्या चंद्राला शाप दिला कि "आजपासून तुझे रूप कोणी पाहणार नाही आणि जो पाहिलं त्याच्यावर चोरीचा आळ येईल". हे एकूण चंद्र पुरता घाबरला. त्याला त्याची चूक समजली आणि त्याने मनापासून बाप्पाची क्षमा मागितली. आपले बाप्पा खूपच क्षमाशील आहेत. बाप्पा चंद्रावर प्रसन्न होउन म्हणाले कि मी पूर्णपणे माझा शाप मागे नाही घेउ शकत. बाप्पाने उशाप दिला कि नेहमी नाही पण वर्षातून फक्त एकदा म्हणजे गणेश चतुर्थीला जो कोणी तुला पाहिलं त्याच्यावर चोरीचा आळ येईल. पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुझा मान असेल. लोक माझ्याआधी तुझे दर्शन घेतील आणि मगच संकष्टीचे व्रत पूर्ण करतील. या कथेवरून आपल्या सगळ्यांना एकच बोध मिळतो कि कोणालाही त्याच्या रुपावरुन जोखू नये, चिडवू नये.
महाराष्ट्रातील गणेश चतुर्थी: महाराष्ट्रात गणेश चतुर्थीपासून सुरु होणारा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इतिहासात घरी गणपती बसवण्याची प्रथा खूप वर्षे जुनी असल्याचा उल्लेख आढळतो. पण सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात एकोणिसाव्या शतकातील आहे आणि याची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली. त्या वेळेस लोकांनी या निमित्ताने एकत्र यावे आणि त्यांच्यामध्ये भारतीय स्वतंत्र लढ्याबाबत जागरूकता यावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता. आजही या गणेश उत्सवाच्या दिवसात अनेक धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
वैशिष्ट्ये गणेश चतुर्थीची: या दिवसाच्या आधीच बाजारपेठेत चैतन्य येते. आरासाचे आकर्षक साहित्य, विद्युत रोषणाईच्या विविध वस्तू अशा एक ना अनेक गोष्टींनी बाजारपेठ सजते. तसेच गणरायाच्या विविध रंगसंगतीच्या, विविध ढंगाच्या मूर्तीही बाजारपेठेत येतात. गणेश चतुर्थीच्या आधीच हि बाप्पाची मोहक रूपे पाहून आबालवृद्ध असे सगळ्यांनाच हरखून जायला होते.
घरीही सगळे एकत्र मिळून येणाऱ्या बाप्पासाठी छान सजावट करून तयारी करतात. बाप्पाचे मखर विविध कल्पना वापरून सजवले जाते. इकडे सार्वजनिक मंडळांचीही लगबग सुरु असते. दरवर्षी अनेक प्रबोधनपर, मनोरंजनात्मक, धार्मिक असे वेग-वेगळे देखावे हि सार्वजनिक मंडळे सादर करत असतात. त्याची तयारीही खूप आधीपासून सुरु असते.
गणेशचतुर्थी दिवशी सगळ्या सग्यासोयऱ्यांबरोबर बाप्पाला उत्साहाने "गणपती बाप्पा मोरया" म्हणत घरी आणले जाते. सार्वजनिक मंडळेही ढोल-ताशांच्या गजरात, मिरवत बाप्पाला मंडपात आणतात. बाप्पाची षोडशोपचार पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपतीला त्याच्या आवडीच्या दुर्वा, जास्वंद वाहून मोदकाचा नैवद्य दाखवला जातो. गणेश चतुर्थीपासून दहा दिवस रोज सकाळ-संध्याकाळ सगळ्यांबरोबर त्याची मनोभावे आरती करून पूजा केली जाते.
घरा-घरात या दिवसांमध्ये म्हणली जाणारी "सुखकर्ता दुःखहर्ता..." हि बाप्पाची आरती खूप प्रसिद्ध आहे. सुखकर्ता म्हणजे सुख देणारा आणि दुःखहर्ता म्हणजे दुःख हरणारा! समर्थ रामदासांनी हि सुंदर आरती लिहली.
गणेश चतुर्थीपासून सुरु होणारा हा गणेश उत्सव प्रत्येकाच्या चालीरीतीनुसार दीड ते दहा दिवसापर्यंत चालतो. दहावा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. बऱ्याच ठिकाणी या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतात. बाप्पाचे विसर्जन करतानाही उत्साही पण तेवढेच भावुक वातावरण असते. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशी आर्त विनवणी करून त्याला भरल्या अंतःकरणाने निरोप दिला जातो.
अशी हि दर वर्षी येणारी गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सव सर्वजण खूप आनंदाने साजरा करतात. ह्या उत्साहामुळे कुटुंबातील लोक एकत्र येतात आणि काही कारणाने विरलेली-उसवलेली नात्यांमधील वीण परत घट्ट होते. वर्षभर ताजेतवाने वाटत राहते आपल्याला. मूर्तींचे विसर्जन झाले तरी मनात मात्र बाप्पा कायम वास्तव करून राहतो. आपल्या श्वासाश्वासात हा उत्सव सामावत जातो आणि आपण उत्सवात...

