गेल्या काही दिवसांमध्ये पावसाळी पर्यटनाला गेलेल्या अनेकांना, खास करून तरुणांना आपला जीव गमवावा लागला. मन विषण्ण करणाऱ्या घटना होत्या ह्या. या अशा घटनांमागची कारणे आणि त्यावरचे उपाय याचा केलेला हा उहापोह...
पहिले
जाणून घेउयात विविध कारणांविषयी:
१. पिढीतले अंतर: वीस-पंचवीस वर्षे
मागे गेलो तर अशा
घटनांचे प्रमाण अगदी नगण्य किंवा
नाहीच म्हणण्याइतपत होते. ८०-९०च्या दशकातल्या
आमच्या पिढीच्या पालकांनी दोन गोष्टींपासून कायम
दूर राहा असे सांगितले.
त्या गोष्टी म्हणजे पाणी आणि आग!
अर्थात पिढ्यांन-पिढ्या पालकत्वात काही फरक होत
नाही. सर्व पालक हे
नेहमीच आपल्या पाल्यांच्या काळजीमुळे त्यांना अशा गोष्टी सांगत
असतात. फरक एवढाच, आमच्या
आणि आधीच्या पिढींनी आपल्या पालकांचे बोलणे शिरसावंद्य मानून कायम पाळले आणि
आजही पाळत आहोत.
अनेक गोष्टींची जमवाजमव करून, म्हणजे पैसे, पालकांना विनंती करून अनेक अटी-शर्थींवर मिळालेली परवानगी, सार्वजनिक वाहतुकीविषयीची इत्यंभूत माहिती काढून, आमच्या पिढीने पर्यटन केले. आणि आपल्याला पुढच्या वेळेसही परवानगी मिळायला काही अडचण येऊ नये म्हणून अतिशय जबाबदारीने सर्वजण सुरक्षित आणि तेही दिलेल्या वेळेत परत यायचे हे आव्हान आम्ही कितीतरी वेळा लीलया पेलले.
२. दळणवळणाचा वाढलेला विस्तार: काही वर्षांपूर्वी पर्यटनस्थळी
जायचे असेल तर बऱ्याच
गोष्टींचा विचार करायला लागायचा. जसे कि खाजगी
वाहने त्यातही चारचाकी वाहने प्रत्येकाच्या आवाक्यात नसायची. चारचाकीच काय दुचाकी घेणे
सुद्धा फार अवघड गोष्ट
असायची. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा आधार घेणे किंवा
चारचाकी वाहन भाड्याने घेणे
असे पर्याय असायचे. आणि रस्त्यांची आताएवढी
परिस्थिती चांगली नसल्याने ह्या पर्यायांचाच विचार
जास्ती व्हायचा.
आत्ता तसे राहिले नाही. रस्त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. आणि आता शाळा संपत असताना किंवा कॉलेजला जाताच दिमतीला दुचाकी येते आहे, काही भाग्यवानांना तर चारचाकीचेही सुख लाभते आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे हातात चांगला पॉकेटमनी किंवा पगाराच्या रूपात चांगला पैसा खेळत आहे. शिवाय अनेक सोशल माध्यमानद्वारे पर्यटनस्थळांची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जीवन इतके धावपळीचे झाले आहे कि आपण पर्यटनाला गेलो नाही तर आपले काही खरे नाही अशीही एक भावना वाढीस लागली आहे. हे काही अंशी खरेही आहे. धकाधकीच्या जीवनात काहीतरी विरंगुळा हवाच!
३. बेजबाबदार कंटेन्टची निर्मिती: आपल्या वैयत्तिक जीवनात सोशल मीडियाने काय
स्थान मिळवले आहे यावर वेगळा
लेख लिहता येईल एवढा मोठा
तो विषय आहे. सोशल
मीडियाच्याही वाढत्या प्रभावामुळे ह्या घटना घडतात.
अनेक जण आजकाल, अनेक धोकादायक ठिकाणी कुठलीही सुरक्षासाधने न घेता जातात. याचे व्हिडीओज, रील्स बनवून समाजमाध्यमांवर टाकतात. आणि यात आव्हानही केले जाते, आम्ही आलोय, तुम्ही कधी येताय इथे!!! आणि दुर्देवाने काही लाइक्सच्या मोहापायी टाकलेल्या या व्हिडीओज/रील्सला भुलुन काही जण अशा धोकादायक ठिकाणी पोहोचतात सुद्धा!
४. समाजमाध्यमांचे अतोनात आकर्षण: छायाचित्र, चलचित्र घेण्याची आता अद्ययावत साधने येत आहेत आणि ती मिळणेही आत्ता सहज शक्य झाले आहे. हि साधने वापरून काहीतरी वेगळे करून समाजमाध्यमांवर टाकण्याची जीवघेणी स्पर्धा आता सुरु झाली आहे. काही लाईक्स, कंमेंट्स किंवा followers वाढावेत याकरता तरुणाई जीवावर उदार होत आहे.
हि झालीत कारणे आणि आत्ता जाणून
घेउयात विविध उपायांविषयी. प्रशासन, सरकार काय करू शकते
याआधी आपण काय काळजी
घेऊ शकतो हे जाणून
घेउयात. कारण आपला जीव
सुरक्षित ठेवणे हि सर्वप्रथम आपली
प्राथमिक जबाबदारी आहे असे माझे
स्पष्ट मत आहे. मी
अविचाराने माझा जीव धोक्यात
घालणार आणि तो इतरांनी,
प्रशासनाने, सरकारने वाचवावा हि अपेक्षाच मुळात
अवास्तव आहे.
चला तर मग जाणून घेउयात काही उपायांविषयी:
१. उन्मादावर मात: पर्यटनस्थळावरचा निसर्ग,
तिथले वातावरण पाहून उन्माद येणे साहजिक आहे.
पण या उन्मादावर मात
करणे किंवा त्या उन्मादाला बळी पडणे
या दोन्हींमध्ये एका सेकंदाच्या काही
अंशाचा फरक असतो. अशा
प्रकारे जीवास मुकणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे.
कुठलाही अविचार करून अनाठायी धाडस करण्यापूर्वी आपले काही बरे वाईट झाले तर, आपल्याला जीव लावणाऱ्या आपल्या पालकांचे काय होईल, आपल्या भावंडाना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला किती मोठा धक्का बसेल याचा जरूर विचार करावा. शेवटी आपल्या पालकांनी कधीतरी नक्कीच सांगितली असेल ती गोष्ट कायम लक्षात ठेवावी. ती म्हणजे पाणी आणि आगीशी कधीही खेळू नये!
२. जबाबदार कन्टेन्टचे निर्माण: आपल्या कन्टेन्ट मधून आपण नेमका
काय संदेश देत आहोत हे
तपासून पाहणे फार गरजेचे आहे.
आपण सगळेच समाजाप्रती काहीतरी देणे लागतो याचे
भान असायलाच हवे. अर्थात असे
भान असणारेही अनेक creators आहेत.
आजकाल आपण आपली सहल नियोजन करायच्या अगोदर सोशल मीडियाचा आधार घेतो. अनेकजण खूप छान पद्धतीने, जबाबदारीने त्यांच्या लेखनातून, व्हिडिओमधून, रील्समधून छान माहिती देतात. हि माहिती इतकी तपशीलवार असते कि बऱ्याच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी जाउन आल्यासारखेच वाटते. यालाच आपण virtual tourism असे म्हणतात.
३. टाळा अनाठायी प्रसिद्धीची हाव: अनेक अशा अपघातांमागचे मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे हेच असते. काही लाईक्स, काही कंमेंट्सच्या मोहापायी आपला जीव धोक्यात घालणे टाळावे. आपले लाखोने असलेले followers आपला अपघात झाला तर आपल्याला वाचवायला येणार नाहीत हे कायम लक्षात ठेवावे. आणि काही दिवसांनी आपल्याला ते विसरूनही जातील हे कटू असले ऐकायला, तरी खरे आहे.
४. चुकीला माफी नाही: अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे सगळ्याच गोष्टींना लागू पडतेच असे नाही. पावसाळ्यात खूपच सुंदर आणि विलोभनीय वाटणारा निसर्ग, त्याच्याशी खेळायला गेल्यावर कठोर बनतो. आपल्या चुका सुधारण्याची, त्यातून शिकण्याची संधी दुर्देवाने निसर्ग फारच कमी जणांना देतो. निसर्ग बऱ्याच वेळेला आपल्याला मकरंद देशपांडेच्या प्रसिध्द सवांदाप्रमाणे हेच सांगत असतो कि चुकीला माफी नाही! त्यामुळे निसर्ग डोळे भरून डोळ्यात साठवावा, कॅमेरामद्धेही टिपावा, आपल्या सगेसोयरानबरोबर त्याचा आनंदही घ्यावा पण कधीही त्याच्याशी खेळायला जाउ नये.
५. सामाजिक भान: काही जण
असे धाडस करत असताना
त्या ठिकाणी इतर अनेक जण
उपस्थित असतात. त्यात वयाने, अनुभवाने मोठी, वडीलधारी मंडळीही असतात. त्यांनी असे कृत्य करणाऱ्यांना
प्रेमाने, हसत-खेळत समजावत
रोखण्याचा प्रयत्न करावा. प्रेमाने आणि हसत-खेळत
अशासाठी कि अन्यथा भांडणे
व्हायचीच शक्यता जास्ती असते.
डोळ्यासमोर जेव्हा कोणाचा असा बळी जातो, तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या इतर लोकांच्या मनःस्थितीवरही खूप मोठा परिणाम होतो. अनेकांना आपण काही करू शकलो नाही याचे शल्य खूप दिवस छळत राहते. अनेकांना कितीतरी दिवस तो प्रसंग आठवून, जेवण जात नाही, झोप लागत नाही. अर्थात असे होणे हे चांगले माणूस असल्याचेच लक्षण आहे. त्यामुळे precaution is better than cure या न्यायाने आधीच असे कृत्य करणाऱ्यांना थांबवायचा प्रयत्न केला तर!
६. नैतिकतेचे धडे: शाळा-महाविद्यालयांमध्ये गुरूंनी विद्येबरोबर नैतिकतेचे धडेही द्यावेत. योग्य वयात जर योग्य गोष्टी कळल्या, समजल्या तर त्याचा खूप फायदा होतो असे माझे मत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जबाबदार पावसाळी पर्यटन यासारख्या विषयांवर चर्चा करून आपण तरुण पिढीचे प्रबोधन करू शकलो तर त्याचा खूप फायदा होईल.
७. काही मार्गदर्शक तत्त्वे:
हि तत्वे सांगण्यापूर्वी मी पुन्हा सांगेन अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरूच नये. पण चुकून
उतरलाच तर
काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हि आहेत काही
मी वाचलेली, ऐकलेली मार्गदर्शक तत्त्वे...
डोंगरमाथ्यावर
जेव्हा प्रचंड पाऊस कोसळतो तेव्हा
खाली असलेले ओढे, धबधबे, पाण्याचे
इतर प्रवाह यातले पाणी काही क्षणात
खूप जास्ती वाढते. प्रवाहाचा वेगही वाढतो. हे वाढलेलं पाणी
आपल्यापर्यंत धोकादायक पद्धतीने पोहोचण्याआधी आपण ओळखू शकतो.
- डोंगरमाथ्यावरून जेव्हा वाढलेले पाणी वेगाने खाली यायला लागते. तेव्हा त्याचा आवाजही नेहमीपेक्षा वाढलेला असतो. पण आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या कोलाहलात, पाण्याच्या, पावसाच्या आवाजात हा वाढलेला आवाज आपल्याला ओळखता येण्यासाठी आपले कान खूप तीष्ण हवेत.
- पाण्याचा रंग अचानक बदलायला लागतो. स्वच्छ असेल तर मातकट व्हायला लागते किंवा कधी कधी उलटेही होते. मातकट असलेले पाणी स्वच्छ व्हायला सुरुवात होते.
- आपण पाण्यात उतरलो होतो तेव्हापेक्षा पाण्यात उभे राहायला किंवा चालायला जरा जास्ती शक्ती लागायला लागते.
- आजूबाजूला किंवा पाण्यात जनावरे, जसे गाई-म्हशी असतील तर ते अचानक पाण्याच्या प्रवाहापासून दूर जायला लागतात. हे सर्वमान्य आहे कि निसर्गातल्या कुठल्याही प्रकोपाची पूर्वकल्पना हि प्राण्यांना खूप लवकर येते.
यापैकी
काहीही झाले तरी, जो
जवळचा सुरक्षित तिर आहे तो
लवकरात लवकर गाठावा. अर्थात
हि ढोबळ तत्वे आहेत.
मी परत नमूद करतो
कि अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरूच नये.
आणि
बाकीही अनेक तत्वे दिलेली
असतात. जी वर्तमानपत्रे, स्थानिक
प्रशासन, सरकार यांच्यातर्फे आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यांचेही तंतोतंत पालन करावे.
उदाहरणार्थ अनोळखी ठिकाणी जाताना कायम स्थानिक वाटाड्याला बरोबर ठेवावे, इत्यादी.
८. सूचना
सरकारसाठी: आपली जबाबदारी आपण
व्यवस्थित पार पडल्यावर आता
सरकार काय करू शकते
यावर बोलूयात.
- आजकाल पर्यटनस्थळी काही अपघात झाल्यास तिथे जाण्यास बंदी घातली जाते. पण सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात अशा अनेक जागा आणि तिथे जाणाऱ्या असंख्य छुप्या वाटा आहेत. प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवण्याएवढे मनुष्यबळ आपल्याकडे नाही. त्यामुळे अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. म्हणून निदान जास्ती जास्त ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत. आणि त्यांची ठराविक कालावधीने निगाही राखली जावी.
- कुठलाही अपघात घडला कि पहिले काही तास खूप महत्वाचे असतात. अनेक पर्यटनस्थळ अशी असतात कि जिथे वाहने पटकन पोहोचू शकत नाहीत. किंवा अनेक ठिकाणी तर मोबाईलचे नेटवर्क पण नसते. अशा ठिकाणी अपघाताची माहिती मिळाल्यावर, लगेच पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करता आली तर उत्तम राहील. अर्थात हेलिकॉप्टरचेही तिथे पोहोचणे त्यावेळेच्या तिथल्या नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असेल. पण समजा पोहोचू शकले तर आपण तातडीची वैद्यकीय सेवा, सुसज्ज साहित्यासहित rescue टीम तिथे उतरवू शकतो.
Rescue टीम्सचा विषय निघालाच आहे तर इथे एक आवर्जून नमूद करावेसे वाटते, असा अपघात घडला तर तिथल्या प्रशासन, पोलीस याबरोबर अनेक rescue टीम्स अपघातग्रस्तांना वाचवण्यात आपला मोठा हातभार लावतात. अशा rescue टीम्समधले मेंबर्स आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून स्वखर्चाने असे जीवावर उदार होऊन काम करत असतात. कुठल्याही मोबदल्याची, कौतुकाची अपेक्षा न ठेवता हे कार्य चालू असते. खरेच त्यांचे खूप कौतुक! फक्त अशांना लवकर घटनास्थळी पोहोचवता आले तर आपण नक्कीच अपघातग्रस्तांचे प्राण वाचवू शकतो.
९. जालीम उपाय: अनेकदा असे अपघात कॅमेरामध्ये
काहीतरी भन्नाट शूट करावे म्हणूनच
घडतात हे आपण पाहिले
आहेच. जाता जाता यावर
माझ्यातर्फे एक जालीम उपाय
सांगतो. अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे,
ऐतिहासिक स्थळे इथे कुठल्याही प्रकारच्या
छायाचित्रणाला बंदी असते. इतकेच
काय तिथे प्रवेश करण्यापूर्वी,
छायाचित्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आपल्याला घेउन जायलाच परवानगी
नसते. असे आपल्याला पावसाळ्यात
पर्यटनस्थळी करता आले तर?
हवे तर अशा ठिकाणी
आपण त्यासाठी लॉकर्सची सुविधा देऊ शकतो जी
अशा बऱ्याच ठिकाणी असते.
काय
फरक पडेल याने, याचा विचार
करून बघा.
- आजकाल आपण पर्यटन स्थळाच्या carrying capacity या विषयावर बरेच ऐकतो आहोत. अशी बंदी घातल्याने जे केवळ निसर्ग, फोटो/व्हिडीओमद्धे आपल्या बॅकग्राऊंडला हवा या हेतूने येतात, अशी मंडळी फिरकणारच नाहीत. म्हणजे आपोआप तिथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण येईल.
- दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे आपण, ज्यांना निसर्ग प्रचंड आवडतो. पण कधीकधी मोबाइल मध्ये तिथले क्षण साठवण्यात आपण इतके वाहून जातो कि तो निसर्ग डोळे भरून बघणे आणि डोळ्यात साठवणे विसरून जातो. हेही बंद होईल, आणि फक्त निसर्गाचा निखळ आनंद घेता येईल आपल्याला.
- अपघातांचे प्रमाणही घटेल. फोटो किंवा व्हिडिओ काढला जाणार नसेल तर कशाला उगाच जीवावर उदार व्हायचे असा विचार केला जाईल!
मित्रांनो, शेवटी परत एकदा अधोरेखित करतो कि आपला जीव सुरक्षित ठेवणे हि सर्वात प्रथम आपली प्राथमिक जबादारी आहे. पावसाळा हा खरे तर माझा प्रचंड आवडता ऋतू, पण या ऋतूत अशा बातम्या वाचून, ऐकून आणि तेही सारखे-सारखे, मला नीट आनंद घेता येत नाही या ऋतूचा. मी अशा पावसाळ्याच्या प्रतीक्षेत आहे कि ज्यात मला असे वेडे साहस करून कोणी आपला जीव गमावून बसले आहे असे ऐकायला मिळणार नाही. आपण सगळेच जण आशा आणि मनापासून प्राथर्ना करूयात कि लवकरात लवकर असा पावसाळा येवो, तथास्तु!
