गुरुविण कोण दाखविल वाट! किती खरे आहे हे. गुरूच नसतील आपल्याला वाट कशी दिसेल? आपल्या भारतीय परंपरेत गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्या परंपरेतला सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा! चला तर मग आज जाणून घेउयात या दिवसाविषयी.
थोडासा इतिहास
आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणले जाते. हि पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. महर्षी व्यास यांना प्रथम गुरु मानतात कारण ते मानव जातीला वेद शिकवणारे पहिले महर्षी होते. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा हि व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.
गुरु-शिष्य व्याख्या
शिकण्याची तयारी असणारा तो शिष्य आणि शिकवण्याची मनापासून तगमग असलेले ते गुरु, हि गुरु शिष्याची साधी व्याख्या.
गुरु हे आपल्या आयुष्यात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे असतात. शिष्यांनी सन्मार्गापासून भरकटू नये म्हणून ते नेहमी त्यांना योग्य वाट दाखवत असतात.
गुरूंशी आपली झालेली ओळख
आपले सगळ्यात पहिले गुरु हे आपले आई-वडील असतात. आई-वडिलांइतके निस्वार्थपणे आपल्याला जगात कोणीच शिकवत नाही. नंतर, शाळेतले शिक्षक आपल्याला गुरूच्या रूपात लाभतात. त्यानंतर महाविद्यालयातले शिक्षकहि आपल्या खूप काही शिकवून जातात. माणूस हा आयुष्यभराचा शिष्य असतो असे मानले तर आपल्याला तसे अनेक गुरु या पूर्ण आयुष्यभरात मिळतात. आपली भावंडे, नातेवाईक, मित्र परिवार, आपल्या आजूबाजूची लोक असे अनेक गुरु आपल्याला लाभतात. यांच्याकडूनही आपण कळत-नकळत काहीना काहीतरी शिकत असतोच. आपल्यातल्या कलागुणांना, एखाद्या छंदाला वाव देणारेही गुरुच असतात.
चांगल्या गुरूंची पारख
चांगल्या गुरूंची पारख कशी करावी? पूर्वीच्या काळात हा प्रश्न फारसा पडत नसला तरी आत्ताच्या युगात मात्र आपल्याला हा प्रश्न पडू शकतो. ढोबळमानाने खाली दिलेल्या गोष्टी ज्या व्यक्तीला लागू पडतात त्यांना आपण चांगले गुरु म्हणू शकतो.
१. ज्ञानाचा सागर असूनही राहणीमान अतिशय साधे असते.
२. शिष्याचे वित्त हरण करण्यापेक्षा चित्त हरण्याकडे जास्ती लक्ष्य असते. म्हणजेच विद्यादानातून मिळणाऱ्या पैश्यांपेक्षा, आपला शिष्य आपण शिकवतोय यात कसा पारंगत होईल याकडे जास्ती लक्ष्य असते.
३. अनेक चांगल्या गुरूंना आपला शिष्य आपल्यापेक्षा सवाई व्हावा हि मनोमन इच्छा असते. त्यामुळे हातचे काहीही राखून न ठेवता विद्येचे दान दिले जाते.
४. शिकवल्या गेलेल्या विद्येत शिष्य पारंगत होईल याबरोबर आपला शिष्य एक चांगला माणूस, नागरिक कसा बनेल याकडेही कसोशीने चांगले गुरु लक्ष्य देतात. इथे विद्येबरोबर नैतिकतेचे धडेहि शिष्यांना मिळतात.
५. यशस्वी झालेल्या शिष्याने आपल्याला श्रेय द्यावे असेही या गुरूंना वाटत नाही. उलट असे श्रेय कोणी शिष्य देत असेल तरी ते नम्रपणे नाकारतात आणि मोठेपणाने सगळे श्रेय त्या शिष्याच्या जिद्दीला, कष्टाला देतात. अर्थात जेव्हा कोणी त्यांना यशस्वी शिष्याचा गुरु म्हणून ओळखतो तेव्हा मात्र त्यांचा उर अभिमानाने भरून येतो.
६. हे गुरु नेहमी त्यांच्यावर शिष्यांचा प्रथम हक्क आहे हे मान्य करतात. त्यामुळे शिष्य नेहमी त्यांच्या विद्यार्जनात काही अडचणी आल्या किंवा काही शंका असल्यास कधीही, कोठेही त्याचे आपल्या गुरूंकडून निरसन करून घेऊ शकतात.

Khup chan👍😊
ReplyDelete